Ad will apear here
Next
बेळगावची सहल
‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात सहल करू या वैशिष्ट्यपूर्ण बेळगावची.  
..........
बेळगाव आणि महाराष्ट्राचे अतूट नाते आहे. ‘गरिबांचे महाबळेश्वर’ अशी बेळगावची ओळख आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या काही लेखनात बेळगावच्या व्यक्तिरेखा व बेळगावचे वर्णन आहे. बेळगाव हे खवय्यांचे गाव आहे. येथे दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल असते. खव्यापासून केलेला कुंदा हा बेळगावचा लोकप्रिय पदार्थ. बेळगावात मिळणारे ‘पाचक’ हे पेय दुसरीकडे कोठेही मिळत नाही. गोव्याचे प्रवेशद्वार असलेले बेळगाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आसपास सुंदर धबधबे, धार्मिक ठिकाणे, तसेच इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे आहेत. निसर्गप्रेमींनाही हा परिसर खूप आवडतो. येथे घटप्रभा वन्यजीव अभयारण्य, लोंढा जंक्शनच्या आसपासचा वनश्रीने नटलेला प्रदेश, कारवारकडे जाताना दिसणारे दांडेली अभयारण्य असे खूप काही बघण्यासारखे आहे. 

रामकृष्ण आश्रम, बेळगाव

१२व्या शतकाच्या उत्तरार्धात बेळगावची स्थापना रत्ता घराण्याने (राष्ट्रकूट) केली होती. त्याअगोदर राजधानी सौंदत्ती येथे होती. यादवराजा कृष्णाच्या १२६१मधील शिलालेखानुसार १३ व्या शतकाच्या सुरुवातीस बेळगाव यादव राज्याचा भाग बनले. १४व्या शतकात ते दिल्ली सुलतानाच्या आधिपत्याखाली आले. १४७४मध्ये बहामनी राजवटीत महमूद गावान याने बेळगाव जिंकले. त्यानंतर लवकरच विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली आणि बेळगाव विजयनगरच्या शासनाखाली आले. विजयनगर पाडावानंतर पुन्हा विजापूर, नंतर औरंगजेब, नंतर शिवाजीराजे, मग हैदर, त्यानंतर पेशवे आणि नंतर इंग्रज अशा राजवटी बेळगावने पाहिल्या. १९४७मध्ये बेळगाव मुंबई राज्याचा भाग होते. ते नंतर कर्नाटकला जोडले गेले. 

बेळगाव पूर्वी वेणुग्राम म्हणून ओळखले जाई. संस्कृतमधील वेलुग्रामचे वेणुग्राम झाले (वेलू म्हणजे वेत /बांबू). कुंदा या खव्याच्या प्रसिद्ध पदार्थामुळे बेळगावला कुंदाग्राम असेही म्हटले जाते. येथे भाजीपाला खूप स्वस्त आहे. 

बेळगावमध्ये फर्निचर व्यवसाय मोठा आहे. आसपासच्या जंगलातून साग व शिसम असे चांगल्या प्रतीचे लाकूड उपलब्ध होत असल्याने येथील फर्निचर उत्तम प्रतीचे आहे. येथे अॅल्युमिनियमचा मोठा कारखाना आहे. बेळगाव हे मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय आहे. तसेच हे औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर असलेले आहे. बेळगाव येथील किल्ला कर्नाटकातील सर्वांत जुना किल्ला मानला जातो. सन १२०४मध्ये रत्ता घराण्यातील (राष्ट्रकूट) राजा कार्तवीर्य याच्या कारकिर्दीत त्याचा सरदार बिचिराज याने हा किल्ला बांधला. हा किल्ला अंडाकृती असून, किल्ल्याला सर्व बाजूंनी खंदक आहेत. किल्ल्याची रचना आक्रमक सैन्यान केलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार करता येईल, अशा पद्धतीने केलेली आहे. किल्ल्याची प्रवेशद्वारे बाहेरील बाजूने प्राणी आणि पक्ष्यांच्या आकाराने सजविली आहेत. प्रवेशद्वारावर पारशी भाषेत शिलालेख असून, त्यांत जकूब अली खान याचा उल्लेख केलेला आहे. सन १६३१मध्ये हे प्रवेशद्वार बांधले गेले. किल्ल्यामध्ये दोन जैन मंदिरे आहेत. 

कमलबासडी जैन मंदिर

कमलबासडी जैन मंदिर अतिशय देखणे असून राज कार्तवीर्य याच्या कारकिर्दीत त्याचा सरदार बिचिराज याने बांधले. हे मंदिर कमलपुष्पांनी सजविलेले आहे. यात २४ तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. कमळाचा डोम खूप सुंदर आहे. किल्ल्यात दोन मशिदीही आहेत. सफा मस्जिद आणि जामिया मस्जिद अशी त्यांची नावे आहेत. १५१९मध्ये सफा मस्जिदची निर्मिती असद खान लारी (फारसी शिलालेखातील उल्लेखाप्रमाणे) याने केली. यातील दोन खांबांवर १२व्या शतकातील कन्नड शिलालेख आहेत. तसेच श्री गणेश व दुर्गादेवीचे मंदिरही आहे. 

कपिलेश्वर हे बेळगावातील सर्वांत जुने मंदिर असून, तेथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. त्याला दक्षिण काशी असे संबोधले जाते. श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, सेंट मेरी चर्च, लष्कर भागातील मिलिटरी महादेव, रामकृष्ण आश्रम ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 

बाळेकुंद्री

श्री पंत महाराज बाळेकुंद्रीबेळगावच्या आसपास :
बाळेकुंद्री या गावामध्ये श्री रामेश्वराचे पुरातन जागृत देवस्थान आहे. येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तिपीठ आहे. हे ठिकाण संत म्हणजेच श्री पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांच्या वास्तव्याने पवित्र झालेले आहे. श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथे राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. अतिशय रमणीय असा हा परिसर आहे. येथे सुंदर तलावही आहेत. श्री पंत महाराजांनी आश्विन वद्य तृतीया शके १८२७ या दिवशी ‘ॐ नम: शिवाय’चा गजर करीत आपला देह ठेवला. पंतांची समाधी बाळेकुंद्री येथे आहे. या स्थानाला आता तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तो गाव आता ‘पंत-बाळेकुंद्री’ म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण बेळगावच्या पूर्वेस १२ किलोमीटरवर आहे.

गोकाक फॉल्स : हे बेळगाजवळील मुख्य आकर्षण आहे. १७१ फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा मिनी नायगारा म्हणून ओळखला जातो. ६५९ मीटर लांबीचा झुलता पूल हे येथील आकर्षण आहे. धबधब्याच्या वरच्या बाजूला दोन-तीन किलोमीटर अंतरावरून तीव्र उताराने येणारे पाणी काळजाचा ठोका चुकविते. धबधब्याच्या वरच्या बाजूला थोड्या अंतरावर घटप्रभा नदीवरील हिडकल धरण आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडले जातात, त्या वेळी याचे रौद्ररूप बघण्यासारखे असते. या ठिकाणचे आणखी एक आकर्षण म्हणजे महालिंगेश्वराचे चालुक्य शैलीत असलेले पुरातन मंदिर. गोकाकला ऐतिहासिक महत्त्वही आहे. येथे एकदा राणी अब्बाका आणि गोकाक कोटावळ यांच्यात लढाई झाली होती. गोकाक शहराच्या पश्चिमेकडे किल्ला आहे. येथे १८८७मध्ये उभारलेले विद्युत निर्मितीकेंद्रही आहे. येथे विशेष प्रकारच्या मातीपासून आणि हलक्या लाकडापासून खेळणी आणि चित्रकलेचा व्यवसाय चालतो. १८८५मध्ये स्थापन झालेली गोकाक मिल भारतातील सर्वांत जुनी मिल आहे. गोकाक मिल सुरुवातीपासूनच हातमागांसाठी धागा, टायर कॉर्ड आणि औद्योगिक धागा, पुढील बुनाई आणि बुटके बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज येथील दर्जेदार यार्न्स जगभरातील बाजारपेठेत उपलब्ध आहेत. गोकाक बेळगावपासून ६० किलोमीटरवर आहे. 

गोकाक धबधबा

गोडाचिमल्की धबधबा

गोडाचिमल्की फॉल्स :
गोकाकपासून १६ किलोमीटर अंतरावर मार्कंडेय नदीवर हा धबधबा असून, रस्त्यापासून अडीच किलोमीटर अंतर चालत जावे लागते. येथे दोन धबधबे बनले आहेत. प्रथम मार्कंडेय नदी ८० फूट उंचावरून येथे उडी घेते. थोडे अंतर गेल्यावर पुन्हा ६० फूट उंचीवरून उडी घेते. हे अत्यंत रमणीय असे ठिकाण असून, धबधब्याच्या गंभीर आवाजाने वातावरण भारावलेले असते. 

हळसी : हे ठिकाण कदंब राजवंशाच्या शाखेची राजधानी असल्याने प्रसिद्ध आहे. हे ऐतिहासिक स्मारक आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध असून, पश्चिम घाटाच्या पार्श्वभूमीवर वनश्रीने नटलेले आहे. बनवसीच्या कदंब राजांची ही दुसरी राजधानी होती. भुवराह नरसिंह मंदिरामध्ये वराह, नरसिंह, नारायण आणि सूर्य यांच्या मोठ्या प्रतिमा आहेत. या ठिकाणी गोकर्णेश्वर, कपिलेश्वर, स्वर्णेश्वर आणि हातकेश्वराचे मंदिरही आहे. हे ठिकाण खानपूरपासून २० किलोमीटर अंतरावर आहे.
 
कित्तूर किल्ला

कित्तूर किल्ला :
देसाई घराण्यातील गौडा सरदेसाई यांनी १६६० ते १६९१दरम्यान हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या आत एक भव्य महालही बांधण्यात आला. हा किल्ला कित्तूरच्या आसपासच्या परिसरात आढळणाऱ्या बेसाल्ट खडकाचा वापर करून बांधण्यात आला आहे. कित्तूर हे गाव राणी चन्नमाच्या शौर्यगाथेमुळे प्रसिद्ध झाले. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणारी ती पहिली भारतीय स्त्री-योद्धी होती. १८५७च्या बंडाच्या आधी ३३ वर्षे राणीने इंग्रजांविरुद्ध पहिला लढा दिला होता. तिचे ब्रिटिशांच्या कैदेतच २१ फेब्रुवारी १८२९ रोजी निधन झाले. 

घटप्रभा पक्षी अभयारण्य : हे अभयारण्य २९.७८ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आहे. अभयारण्य डेमोइझेल क्रेन, युरोपियन व्हाइट टार्क इत्यादी स्थलांतरित पक्षी पाहता येतात. नोव्हेंबर आणि मार्च हा या ठिकाणाला भेट देण्याचा उत्तम कालावधी असतो. त्या कालावधीत बहुतेकसे स्थलांतरित पक्षी मुक्कामाला असतात. 

पारसगड : हा किल्ला शिवाजी महाराजांनी सन १६७४मध्ये बांधला होता. तो सौंदत्तीच्या दक्षिणेस आहे. 

वल्लभगड : संकेश्वरजवळील वल्लभगड किल्ला शिवाजी महाराजांनी १६७४मध्ये बांधला. 

सौंदत्ती किल्ला

यल्लम्मा देवीचे मंदिर, सौंदत्तीसौंदत्ती : हे यल्लम्मा देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले यात्रेचे ठिकाण आहे. याचे ऐतिहासिक नाव सुगंधवर्ती, सुगंधीदिपुरा असे होते. या ठिकाणी १२व्या शतकापर्यंत रत्ता घराण्याची (राष्ट्रकूट) राजधानी होती. इ. स. १२००नंतर ती बेळगाव येथे हलविण्यात आली. या शहरामध्ये अंकितेश्वर, पुरादेश्वर, नागकारे मल्लिकार्जुन, वीरभद्र, उल्वी बसेश्वरावा, मौनेश्वर व व्यंकटेश्वर ही मंदिरे आहेत. सन १०४८मध्ये बांधलेले कल्याणी चालुक्य शैलीतील अंकितेश्वर भुयारी मंदिर देसाईगल्लीमध्ये आहे. नविलतीर्थ धरणाचा रेणुकासगार जलाशय सौंदत्तीच्या खालच्या भागाला स्पर्श करतो. येथे जोगुलभावी नावाचे एक ठिकाण आहे. यल्लम्मा पर्वतावर जाण्यापूर्वी यात्रेकरू येथे स्नान करतात. 

सौंदत्तीपासून पाच किलोमीटरवर असलेले यल्लम्माचे मंदिर सन १५१४मध्ये रायबागच्या बोमप्पा नाईक यांनी बांधले. या मंदिराभोवती आढळलेले अवशेष आठव्या शतकाच्या मध्यापासून ते ११व्या शतकापर्यंतचे असावेत असा अंदाज आहे. त्यामुळे राष्ट्रकूट किंवा चालुक्य कालखंडाच्या काळात येथे एक मंदिर असावे, असे दिसून आले आहे. 

निपाणी : हे शहर राष्ट्रीय हमरस्त्यावरच आहे. कोल्हापूरहून बेळगावला जाताना कर्नाटकातील हे पहिले मोठे गाव लागते. ते शेती आणि स्थानिक वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. तंबाखू व्यवसाय, बिडी कारखाने, तंबाखू कारखाने, फाउंड्री व्यवसाय, टाइल व्यवसाय, लाकूड व्यवसाय आणि अॅल्युमिनियम पॉट बनविण्याचे कारखाने यासाठीही निपाणी प्रसिद्ध आहे. निपाणीच्या आसपास चार साखर कारखाने आहेत. 

पर्यटक निपाणीकर वाड्यामध्ये भिंतीवरील १९व्या शतकातील चित्रे पाहू शकतात. जवळच्या शिरगुप्पी येथून निपाणी शहराचे संस्थापक श्रीमंत सिद्धोजी राज नाईक निंबाळकर यांनी बांधलेली जुनी पाणीपुरवठा योजना ‘उदित बंबाचे पाणी’ या नावाने प्रसिद्ध आहे. 

वज्रपोहा धबधबा

निपाणीपासून पाच किलोमीटर अंतरावर तावंडी घाटाच्या सुरुवातीलाच येथे चार जैन मंदिरे आहेत. समाजाच्या सर्व वर्गांमधून ब्रह्मदेवाची विशाल मूर्ती बघण्यासाठी लोक येथे येतात. मुख्य रस्ता आणि तीर्थ मंदिर यांच्या दरम्यान देवी पद्मावतीला समर्पित असलेले एक मंदिर आहे. 

कसे जाल बेळगावला?
बेळगाव हे हवाईमार्ग, रेल्वे आणि हमरस्त्याने सर्व देशाशी जोडले गेले आहे. बेळगावजवळच सांबरे येथे विमानतळ आहे. बेळगाव हे पुणे-बेंगळुरू महामार्गावर असून, कोल्हापूरहून येथे येण्यासाठी दिवस-रात्र बससेवा चालू असते. बेळगावमध्ये राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. संपूर्ण वर्षभर येथे जाऊ शकता. पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी जुलै ते सप्टेंबर हा चांगला कालावधी. 

गेले काही दिवस आपण या सदरातून कर्नाटक राज्याची सफर करत होतो. या राज्यावर आधारित हा शेवटचा लेख असून, पुढील भागापासून महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZGOBW
Similar Posts
कर्नाटकचा रमणीय किनारी प्रदेश ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण शिमोगाची सैर केली. आजच्या भागात माहिती घेऊ या कर्नाटकच्या किनारी भागातील पर्यटनस्थळांची....
चालुक्यांची राजधानी - बदामी एके काळी दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेल्या चालुक्य राजांची बदामी ही राजधानी. ‘करू या देशाटन’ सदरात आज सैर करू या त्याच ठिकाणाची...
वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...
कावेरीच्या खोऱ्यातील रम्य प्रदेश ‘करू या देशाटन’ या सदरात आपण सध्या कर्नाटक राज्याची सैर करत आहोत. बेंगळुरूहुन म्हैसूरला जाताना मंड्या जिल्हा पार करून जावे लागते. कावेरीच्या खोऱ्यातील हा प्रदेश ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेवा असलेल्या पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. आज या जिल्ह्यात फेरफटका मारू या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language